Wednesday, January 23, 2008

खिचडी

तुम्हाला पडवळाचा मुरंबा करता येतो? म्हणजे, पुलंच्या शब्दांत, एक पडवळ घ्यावं, ते उभं चिरावं, वगैरे वगैरे. माझी (खरं सांगायचं तर आमच्या बाबांची) एक पाककृती, जी मी पुढे लिहिणार आहे, तिचं नावंच ऐकून लोक तो मुरंबा खाल्ल्यासारखं तोंड करतात. साबुदाण्याची खिचडी? कांदा घालून?? पावनं, बरं वाटत नाही का काय?

आपल्याकडे साबुदाण्याला एक स्थान आहे, ते म्हणजे फक्त उपवासाच्या खाण्यात. नाही म्हणलं तरी, वड्यांनी साबुदाण्याला थोडंसं "चमचमीत खाणं" या सदरात आणण्याचा एक क्षीण प्रयत्न केला पण तोही फसला. आता तर अशी अवस्था आहे की साबुदाणा म्हणलं की डोळ्यासमोर एखादी मूर्ती, नाकासमोर उदबत्तीचा वास (ज्याने मला खोकला येतो) यायलाच पाहीजे. अशा वातावरणात, तुम्हीच सांगा, कांदा अश्या अत्यंत अधार्मिक प्रवृत्तीच्या मुलाशी साबुदाण्याच्या खिचडीसारख्या सुशील मुलीचं कोणता बाबा लग्न लावून देईल? (मी सध्या "मार्केट"मध्ये असल्याने माझ्या उपमाही तशाच)

पण जर तुम्ही असल्या पुरोगामी विचारांचे नसाल आणि नुसते पोहे उपमा खाउन कावले असाल तर कधीतरी एखाद्या रविवारी कु़टुंब माहेरी किंवा किटी पार्टीला गेल्याची संधी साधून ही खिचडी ट्राय मारा.

एक वाटी साबुदाणा - दोन-अडीच वाटी पाण्यात धुउन दीड-दोन तास भिजवून ठेवा.ते भिजले की त्यातलं जास्तीचं पाणी काढून त्यात चवीनुसार दाण्याचा कूट, मीठ, थोडंसं तिखट आणि चिमूटभर साखर टाकून बाजूला ठेवा.एक कांदा आणि एक हिरवी मिरची बारीक चिरा. कढईत तेल गरम करून त्यात जिरे तडतडू द्या. ते झालेले वाटले की मिरची नि कांदा परतून घ्या. कांदा "मस्त तेल मैं फ्राय" करून झाला की त्यामध्ये साबुदाणा व इतर जिन्नस मिसळा व झाकण ठेउन शिजू द्या. साधारण १५/२० मिनिटांनी ते उतरवा व वर ओला खवलेला नारळ आणि "बारीक कटा हुआ हरा धनिया" भुरभुरवून गरम गरम खा.

आणि ती खाऊन "अजि मी आज ब्रम्हांड पाहिले" असे वाटले नाही तर सांगा.

येतो मग,

No comments: