Tuesday, March 22, 2005

रिस्क

too much!

दारू पिताना मी कधी रिस्क घेत नाही.

मी संध्याकाळी घरी येतो,
तेव्हा बायको स्वयंपाक करत असते,
शेल्फमधील भांडयांचा आवाज येत असतो.
मी चोरपावलाने घरी येतो,
माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो,
शिवाजीमहाराज फोटोतून बघत असतात
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही.
कारण मी कसलीच रिस्क घेत नाही. ||१||

वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरून मी ग्लास काढतो.
चटकन एक पेग भरून आस्वाद घेतो.
ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो.
अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो
शिवाजीमहाराज मंद हसत असतात.
स्वयंपाकघरात डोकावून बघतो
बायको कणीकच मळत असते
या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही.
कारण मी कसलीच रिस्क घेत नाही. ||२||

मी: "जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं?"
ती: "छे! दानत असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ!"

मी परत बाहेर येतो.
काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो.
बाटली मात्र मी हळूच काढतो.
वापरात नसलेल्या फळीच्या मोरीवरून ग्लास काढतो.
पटकन पेगचा आस्वाद घेतो.
बाटली धुवून मोरीत ठेवतो.
काळा ग्लासपण कपाटात ठेवतो.
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही.
कारण मी कसलीच रिस्क घेत नाही. ||३||

मी : "अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झालं नाही."
ती: "नाही काऽऽय! अठ्ठावीस वर्षाची घोडी झालीय म्हणे!"
मी : (आठवून जीभ चावतो) "अच्छा .. अच्छा .."

मी पुन्हा काळ्या कपाटातून कणीक काढतो
मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते.
फळीवरून बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो
शिवाजीमहाराज मोठ्ठयाने हसतात
फळी कणकेवर ठेवून शिवाजींचा फोटो धुवून
मी काळ्या कपाटात ठेवतो
बायको गॅसवर मोरीच ठेवत असते
या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही.
कारण मी कधीच .... ||४||

मी (चिडून) : "जाधवांना घोडा म्हणतेस? पुन्हा बोललीस तर जिभच कापून टाकीन तुझी ... "
ती: "उगीच कटकट करू नका.. बाहेर जाऊन गप पडा."

मी कणकेतून बाटली काढतो
काळ्या कपाटात जाऊन एक पेग मळतो
मोरी धुवून फळीवर ठेवतो
बायको माझ्याकडे बघत हसत असते.
शिवाजीमहाराजांचा स्वयंपाक चालूच असतो
पण या जाधवांचा त्या जाधवांना पत्ता नाही.
कारण मी .... ||५||

मी (हसत हसत): "जाधवांनी घोडीशी लग्न ठरवलं म्हणे!"
ती (ओरडून): "तोंडावर पाणी मारा ऽऽऽ "

मी परत स्वयंपाकघरात जातो.
हळूच फळीवर जाऊन बसतो
गॅसही फळीवरच होता.
बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो.
मी डोकावून बघतो.
बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते.
या घोडीचा .. त्या घोडीला पत्ता लागत नाही.
अर्थात शिवाजीमहाराज कधीच रिस्क घेत नाहीत.
जाधवांचा स्वयंपाक होईपर्यंत
मी फोटोतून बायकोकडे बघत हसत असतो
कारण पण मी कधीच रिस्क ... ||६||

signing off,

No comments: